We will fetch book names as per the search key...
About the Book:
जाती व्यवस्था ही एक समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन काळात ह्या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पूर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. हिंदू धार्मिक साहित्यामध्ये वर्ण व्यवस्था अनेक ठिकाणी नोंदवलेली आहे, मानवी समाजाच्या रचनेची ती एक आदर्श व्यवस्था म्हणूनच तिचे वर्णन करण्यात येते. तुलनात्मक विचार केला तर अगदी हिंदू मिथकानुसार ब्रह्म, महेश आणि विष्णू या त्रिदेवांचे असलेले वर्णव्यवस्थेतले पहिले तीन वर्ण ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य या गटांसाठी युरोपामधील समाजांमध्ये समांतर सामाजिक दर्जाचे गट अस्तित्वात असल्याचे पहायला मिळते. परंतु शूद्र असा जो खास गट केवळ भारतीय वर्णव्यवस्थेमध्येच व्यवस्थेबाहेर, खाली असलेल्या गटांसाठी उचनीचतेची विषवल्ली उगवत अस्तित्वात आला किंवा आणला गेला, त्यामुळेच या आदर्शवत व्यवस्थेचा ऱ्हास झाल्याचे खेदाने म्हणावे लागेल. उच्च-उच्चनीचतेच्या वंशवादी संकल्पनांनी प्रभारीत होऊन गटबाजीमुळे आणि भेद भावांच्या निर्मितीमुळे जातीय विभाजने होण्यास मदत होते, जातीय विभाजने आर्थिक संधींशी जोडल्याने जाती व्यवस्थेला आणखीन वेगळे जटिल वळण मिळते. धर्म, वंश, परंपरा या सगळ्या गर्तेमधून वाट काढण्यासाठी अस्तित्वात आलेल्या या व्यवस्थाच मूल्यभेदांमधून जटिल सामाजिक समस्या निर्माण करत आहेत. माझ्या मते हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.
‘मिल्क्या' ही अशीच सामाजिक वर्णभेदातुन निर्माण झालेली शोकांतिका सांगणारी कादंबरी आहे. वर्णव्यवस्थेची पडझड, जातीय राजकारण, दबावाचे शासनतंत्र, सामाजिक व आर्थिक दरी, त्यातूनच निर्माण होणारा शोषित वर्ग व त्याची मुस्कटदाबी, उचनीचतेच्या बुरसट विचारांतून निर्माण होणारा द्वेष व तिरस्कार, स्त्रीत्वाला कमी लेखणाऱ्या जुनाट रूढी-परंपरा-चालीरिती, महिला अत्याचारांची भयावह अवस्था, कुटुंब व्यवस्था, बहीण-भावाचे प्रेमळ नाते, आधुनिक तरुणाईचा आधुनिक विचार, अश्या अनेकानेक समकालीन सामाजिक वास्तवाला आणि मानवी मनाच्या बऱ्या-वाईट गुणधर्मांना लेखनातून अभिव्यक्त करणे साहित्य कलाकृतीसाठी आवश्यक ठरते.
माझ्या या पहिल्या-वहिल्या वास्तवाधारित काल्पनिक लेखनाला वाचक रसिक व सन्माननीय समीक्षक कसा प्रतिसाद देतात याची मला खूपच उत्सुकता आहे. जातीपातीच्या उच-निचतेच्या उतरंडीमुळे जन्मजात होणाऱ्या यातनांच्या जाणिवेतून या कादंबरीने जन्म घेतला आहे.अगदी लहानपणापासून माझ्या अवती-भवती समाजामध्ये घडणाऱ्या जातीय समीकरणाधिष्टित घडामोडी हेच या कादंबरीचे उगमस्थान आहे. आपल्याकडे असलेल्या निरीक्षणतत्व, जाणिवा आणि अनुभव यांच्याशी प्रामाणिक राहून केलेल्या लेखनाचे फलित म्हणजेच 'मिल्क्या' ही कादंबरी आहे असे मी मानतो.
- गणेश चौधरी
About the Author:
गणेश चौधरी हे एक नवोदित लेखक असून 'मिल्क्या' ही त्यांची पहिलीच कादंबरी प्रकाशित होत आहे. ते पुणे जिल्ह्यातील छ. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवजन्मभूमी जुन्नर या तालुक्यातील 'उदापूर' या छोट्याश्या गावचे रहिवासी असून एका शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म आहे. त्यांचे प्राथमिक-माध्यमिक-महाविद्यालयीन शिक्षण हे त्यांच्या गावातच झाले. वाणिज्य विभागातील पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुणे शहर गाठले आणि काही काळ एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी केली. मितभाषी असलेल्या गणेश चौधरी यांना लहानपणापासूनच त्यांच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे, परिस्थितीचे निरीक्षण करण्याची सवय होती. त्याच वास्तवातल्या निरीक्षणांना काल्पनिक मुलामा देत त्यांच्या 'मिल्क्या' या कादंबरीचा जन्म झाला. सध्या गणेश चौधरी हे पेशाने गुंतवणूकदार आहेत, तसेच ते आपल्या मूळ गाव उदापूर ता. जुन्नर जि. पुणे येथील वडिलोपार्जित शेती सांभाळत आहेत.