We will fetch book names as per the search key...
About the Book:
साहित्याच खरं सामर्थ्य म्हणजे भकास जीवनाला झकास करून टाकणं! कधी समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळणारी तर कधी भावनांच्या ओलाव्याने गारठलेली, कधी सैरभैर धावणारी अल्लड तर कधी सर्वांचा विचार करणारी जबाबदार, कधी प्रेमरूपी शब्दांच्या जाळ्यात अडकलेली तर कधी तिरस्काराने बरबटलेली कधी समाजकंटकांना तुडवणारी तर कधी समजरक्षकांचा सांभाळ करणारी कलाकृती म्हणजे साहित्य!
अगदी अशाच काही झकास भूमीका रेखाटणारी कलाकृती म्हणजे ती वाट बघत्येय....
गावसेमामांचं इरसाल व्यक्तिचित्र मनावरील ताण कमी करतं तर राधिकाच जीवन वाचून डोळ्यांत पाणी उभं करत, मृगनयनी जीवनाचे वेगवेगळे पैलू उलगडते तर आदित्यतेजाभिलाषी प्रेरणा निर्माण करतो.
अशाप्रकारे 'ती वाट बघत्येय' पासून सुरू होणारा भुताटकीचा प्रवास, संशयाचे भूत, जीवनातील सुखाचा बुरखा दूर करणारा धुम्रपानाचा झुरका, अंधश्रद्धा इत्यादी स्टेशन घेत पाटलाच्या वाड्यात येऊन विज्ञानाच्या सहाय्याने सुखान्त संपन्न होतो.
About the Author:
एक अनुभव संपन्न, संवेदनशिल, जागरुक मनाचे, वैचारीक, विवेचनात्मक, काव्यलेखन करणारे, कवितेचा वारसा जपणारे, व्यासंगी व्यक्तीमत्त्व म्हणून औरंगाबाद येथे आपला नावलौकिक आहे.
महाविद्यालयीन काळापासून कथा कविता लेखनाचा व्यासंग, नोकरी करत असतांनाही आणि सेवानिवृत्ती घेतल्यावरही आजतागायत जोपासला आहे. अनेक वृत्तपत्रातून कविता प्रकाशित. बऱ्याचशा साहित्य संमेलनामध्ये सातत्यपूर्ण सहभाग, तिफण साहित्य संमेलन , भूमीजन साहित्य संमेलन, शेतकरी साहित्य संमेलन, घे भरारी साहित्य संमेलन, झेप साहित्य संमेलन, गच्चीवरील काव्य मैफल, अशा अनेक समेलनांमध्ये आपण सातत्याने सहभागी होत आहात. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून कांचन नावाची कादंबरी १९९८ साली प्रकाशित झाली आहे.
प्रातिनिधिक काव्यसंग्रहांसह अनेक संग्रहात आपल्या कविता प्रकाशित झाल्या आहेत, कथा नवलेखकांच्या, भावनांचा कल्लोळ, इत्यादी प्रातिनिधिक कथासंग्रहात कथा प्रकाशित आहेत. अनेक दिवाळी अंकातही कथा, कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
काव्यस्पंदन या राज्यस्तरीय व्हाट्सप ग्रुपवर घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त. 2018 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण- काव्यस्पंदन सम्राट कवी हा मानाचा पुरस्कार प्राप्त.
सोशल मीडियावर होणाऱ्या ऑनलाइन स्पर्धां मध्ये आपणास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.
स्टोरीमिरर च्या ऑथर ऑफ द इयर २०१८ चा रौप्य पदक यशोकिर्तीत दिमाखात झळकत आहे. तसेच ऑथर ऑफ द इयर २०२० च्या यशस्वी टॉप टेन मधील सहभागातूनच हे पुस्तक आपल्या हाती येत आहे.